पुस्तके:-

वर्कशॉपमधील कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान मराठीतून मिळावे हा या पुस्तक निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. ही पुस्तके गुणवत्तेच्या दृष्टीने इंग्रजी पुस्तकांच्या तोडीस तोड असतील, यासाठी आमचा प्रयत्न राहील.

प्रस्तावित पुस्तके पुढीलप्रमाणे:

  • सुलभ यंत्रशाळा – मराठीतून दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला यंत्रशाळेतल्या कामासाठी प्रशिक्षण.
  • प्रगत यंत्रशाळा – आधुनिक यंत्रसाधनांची माहिती; सीएनसी यंत्रे, टूलिंग, मशीन प्रोग्रॅमिंग.
  • यंत्रशाळा हस्तपुस्तक – यंत्रशाळेत काम करताना लागणारी सर्व माहिती देणारे संदर्भपुस्तक.
  • जोडणी काम (असेंब्ली फिटर).
मासिके:-
धातुकाम – यंत्र आणि तंत्र ’ मासिक:-

‘मॉडर्न मशीन शॉप’, ‘अमेरिकन मशीनिस्ट’ अथवा ‘फर्टिगुंग’ या परदेशी मासिकांच्या धर्तीवर ‘ धातुकाम – यंत्र आणि तंत्र’ हे मराठी मासिक काढण्याची तयारी चालू आहे. मशीन-टूल्स वापरून यंत्रभाग बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियांसंबंधी नवनवी माहिती वाचकांपर्यंत पोचवणे हे मासिकाचे मुख्य काम असेल. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील आर्थिक घडामोडी, नवी उत्पादने, नवे कारखाने, यासारखी माहितीदेखील मासिकात असेल. कामगार, सुपरवायझर आणि अधिकारीवर्ग – या सर्वांना उपयोगी वाटणारी काही ना काही नवी माहिती प्रत्येक अंकात असावी असा आमचा प्रयत्न राहील.

पहिल्या तीन अंकांचे प्रमुख विषय पुढीलप्रमाणे असतील:
  • अंक १ – स्वयंचलन (ऑटोमेशन).
  • अंक २ – परीक्षण आणि मोजमाप उपकरणे ( इन्स्पेक्शन अॅंड मेझरिंग इक्विपमेंट ).
  • अंक ३ – कर्तन हत्यारे आणि संबंधित उपकरणे ( कटिंग टूल्स आणि रिलेटेड इक्विपमेंट)

पुढील अंकांमध्ये ‘यंत्रसाधन उपकरणे’ (मशीन टूल अॅक्सेसरीज)’, ‘कठीण पदार्थ कातन ( हार्ड टर्निग )’, ‘पकड साधने (क्लॅंपिंग इक्विपमेंट)’ इत्यादि विषय हाताळले जातील.

सुरुवातीचे तीन अंक

आमच्या कल्पनेप्रमाणे, महाराष्ट्रात सहजच पाच हजारपेक्षा जास्त इंजिनीअरिंग वर्कशॉप्स आहेत. आपण पहिल्या तीन अंकांच्या पाच-पाच हजार प्रती काढून त्या पाच हजार पत्त्यांवर विनामूल्य पाठवणार आहोत. अंक आवडल्यास वर्षाची एक हजार रुपये वर्गणी भरून वर्गणीदार बनण्याचे आवाहनही या विनामूल्य अंकांसोबत करण्यात येईल. असे अंक पाठवल्याने, अंकाच्या स्वरूपाबद्दल वाचकांच्या प्रतिक्रियादेखील मिळतील, त्या पुढील अंकांच्या सुधारणांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील.

जाहिराती:-

मशीन टूल क्षेत्रात ‘धातुकाम’ मासिकाबद्दल कुतुहल असलेले आणि मासिकाचे भले चिंतणारे असंख्य लोक आहेत. त्यांच्याकडून जाहिरातींच्या स्वरूपात भरपूर सहकार्य मिळेल असा आमचा विश्वास आहे. मासिकाची निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची राहतील याची खबरदारी आम्ही घेत आहोत. त्याशिवाय पहिल्या तीन अंकांच्या पाच हजार प्रती निश्चितपणे या व्यवसायाशी संबधित लोकांकडे आणि कारखानदारांकडे पोचणार आहेत.