बहुउद्देशीय ‘प्लँट मॅनेजर’ प्रणाली

Udyam Prkashan Marathi    26-Dec-2019   
Total Views |

1_1  H x W: 0 x
 
 
उद्योग जगतामध्ये इंडस्ट्री 4.0 या संकल्पनेचे अनेक पैलू वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला पहायला मिळतात. संगणकीय ERP सिस्टिम हा त्याचाच भाग जरी नसला तरी गेल्या 10-15 वर्षांत मोठ्या कंपन्यांबरोबरच लघु, मध्यम उद्योगांमध्येही त्याचा वापर सुरू झालेला दिसतो आहे. भारतामध्ये सध्या अंदाजे तीस लाखाहून जास्त उद्योग लघु, मध्यम या गटात येतात. अशा उद्योगांना ERP सारख्या महागड्या प्रणाली राबविण्यात अनेक अडथळे येत असतात. वर्षानुवर्षे चालत आलेली यंत्रसामुग्री आणि जुन्या पद्धतींना सरावलेले कर्मचारी अशा प्रकारची यंत्रणा आत्मसात करू शकत नाहीत. याचबरोबर आणखी एक बाब नेहमी निदर्शनास येते ती म्हणजे, ERP ही पूर्ण उद्योगाची प्रणाली असल्यामुळे उद्योगातील आर्थिक बाबींशी निगडित व्यापक प्रमाणावर माहिती उपलब्ध होते, परंतु त्याचा लहान उद्योगांना प्रत्यक्ष शॉपवर कामाचे नियोजन करण्यासाठी मर्यादित उपयोग होत असतो. कोणत्याही उद्योगामध्ये शॉपवर केलेल्या कामातून धनसंपत्ती निर्माण होते. अशा ठिकाणी उत्पादन नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी त्यावर भर देणार्‍या प्रणालीची जास्त गरज असते. ही निकड ओळखून उत्पादन व्यवस्थेचे नियोजन उत्तमरीतीने करण्यासाठी आम्ही ‘प्लँट मॅनेजर’ सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली आहे.
 
संकल्पना 
 
छोट्या उद्योगांमध्ये उत्पादन नियोजन आणि नियंत्रण करण्याचे कार्य प्लॅनर करतात. यांच्या कामाचे स्वरूप बहुधा रजिस्टर लिहिणे, झालेल्या कामाच्या आणि राहिलेल्या कामाच्या नोंदी करणे, उत्पादनाचे वेळापत्रक आणि दैनंदिन अहवाल लिहिणे अशा स्वरूपाचे असते. शॉपवरील थेट नियोजनाचा ताण प्लॅनरवर सतत असतो. अतिरिक्त नोंदींचे काम, निरनिराळ्या कारणांमुळे होणारा उत्पादनातील विलंब, ग्राहकांचा पाठपुरावा अशा गोष्टींमुळे हे काम जाचक तर होतेच, परंतु अशा प्रकारचे कार्य इतरांना जमत नसल्यामुळे रजेच्या दिवशीसुद्धा ‘सकाळी येऊन तेवढा लोड लावून जा’ अशा फर्मानाची त्यांना सवय करावी लागते. उत्पादनाचा पाठपुरावा करण्याचे काम बर्‍याचवेळा पर्यवेक्षक करतात. उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येकाचे वेगळे असे ठोकताळे असतात. अशा उद्योगांमध्ये शास्त्रीय पद्धतीने नियोजन होत नसल्यामुळे नियोजनाची कार्यक्षमता खालावते. वेळेवर कच्च्या मालाचा पुरवठा न होणे, ग्राहकाला वस्तुंचा पुरवठा वेळेत न होणे, 100% पुरवठा न होणे अशा गोष्टी हमखास घडतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर पुरवठा आणि कॅश फ्लो यांचा घनिष्ठ संबंध आहे. मालाचा वेळेवर पुरवठा न झाल्यास एकूण आर्थिक गणित बिघडते. प्लँट मॅनेजर ही प्रणाली प्लॅनरच्या नियोजनाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. ही प्रणाली अ‍ॅडव्हान्स्ड् प्लॅनिंग सॉफ्टवेअर (APS) आणि फायनाइट कपॅसिटी शेड्युलिंग (FCS) सारख्या आधुनिक पद्धतींचा अभ्यास करून बनविलेली असल्यामुळे वेळेवर योग्य माहिती पुरविते आणि निर्णय प्रक्रियेला मदत करते.
 

2_1  H x W: 0 x 
 
प्रणाली कशी काम करते?
 
लहान उद्योगांमध्ये बहुतांश ठिकाणी क्षमता (कपॅसिटी) मर्यादित असते. या मर्यादेत राहून कारखानदार ऑर्डर मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. काही अंशामध्ये उत्पादन चालू असताना एखादी अधिक मागणी आली, तर आपण त्याचा पाठपुरावा करून ती कधी पूर्ण करू शकतो, याचा केवळ अंदाज विपणन व्यवस्थापक अथवा मालकाला करता येतो. अशावेळी मागणी पूर्ण करण्याच्या वेळेचे आश्वासन बहुतेकवेळा ग्राहकाच्या कलाने घेऊन दिले जाते आणि अर्थातच ते नेहमी पाळले जाईल याची शाश्वती नसते. ‘वेळेवर पुरवठा न करता येणे’ याच्या भल्याबुर्‍या परिणामांचे गांभीर्य बर्‍याचदा कमी असल्याचे दिसते. वेळेवर पुरवठा (ऑन टाइम डिलिव्हरी, OTD) ही संकल्पना कसोशीने जपणार्‍या उद्योजकांना त्याचा अनेक पातळ्यांवर फायदा झाल्याचे दिसते. उदाहरणार्थ, पुढील ऑर्डर मिळण्याची शक्यता वाढते, त्यांची पत वाढते, आर्थिक गणिते सुधारतात, शॉपवर अतिरिक्त ताण न आल्याने कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारते इत्यादी. 
 
प्लँट मॅनेजर ही प्रणाली सर्व प्रकारच्या उत्पादन उद्योगांमध्ये उत्पादनाचे नियोजन आणि वेळापत्रक या महत्त्वाच्या बाबींमध्ये मार्गदर्शन करते. आपल्या कारखान्यातील सर्व यंत्रांची क्षमता आणि मनुष्यबळ लक्षात घेऊन मागणीची पूर्तता कशी करता येईल याचे नियोजन होते. आपल्याकडे आज असलेल्या ऑर्डर, त्यांची पूर्तता करण्यासाठी लागणारा वेळ याचे नियोजन करतानाच कारखान्यातील इतर सर्व संबंधित बाबींचा अभ्यास होऊन संपूर्ण उत्पादनाचे नियोजन होते. तसेच प्रत्यक्ष प्रत्येक यंत्रावर कोणत्यावेळी कोणते उत्पादन करायचे याच्या सूचना मिळतात. समजा 10 ऑर्डरचे काम चालू असताना एखाद्या ग्राहकाची महत्त्वाची आणि तातडीची मागणी आली तर त्याचे इतर उत्पादनांवर काय परिणाम होतील हे या प्रणालीमुळे आपल्याला क्षणार्धात समजू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत बदल केल्यास कोणकोणते परिणाम होतील ही नियोजनासाठीची महत्त्वाची माहिती तत्परतेने मिळते. यंत्रणेत सुचविलेले बदल मंजूर करण्याची मुभा असते आणि ते बदल मान्य केल्यास काही मिनिटांतच नवीन वेळापत्रक तयार होऊन संबंधितांकडे पाठविले जाते. अशा पद्धतीमुळे एकंदर उद्योगाचाही प्रतिसाद वेळ (रिस्पॉन्स टाइम) लक्षणीयरित्या सुधारतो. 
 
प्लँट मॅनेजरचे उपयोग 
 
प्रत्यक्ष उत्पादन सुरू असतानाही प्लँट मॅनेजर प्रणालीचा उपयोग होतो. उद्योगाच्या एकूण क्षमतेपेक्षा जास्त मागणी आली तर (ही परिस्थिती नेहमी अपेक्षित आहे) चांगले नियोजन आवश्यक आहे. अशा वेळी कोणते उत्पादन आधी घ्यायचे, बॅकलॉग कसा आणि कधी भरून काढायचा, ग्राहकाला त्याची मागणी पूर्ण होण्याचे वचन (कमिटमेंट) द्यावयाचे अशा अनेक बाबींमध्ये प्लँट मॅनेजर मदत करते. साखळी प्रक्रियेतील उत्पादन करताना बॅच साइजमध्ये बदल करणे, एकाचवेळी छोट्या बॅचमध्ये अधिक मशिनवर निरनिराळी कामे करणे इत्यादी बाबींमध्ये मार्गदर्शन मिळते, तसेच प्रत्यक्ष वेळापत्रकाचीही सोय होते. यामुळे निर्णय घेणे तर सोपे जातेच, परंतु एकूण वेळेमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. उत्पादन सुरू असताना त्यातील बदल तपासले जातात. प्रत्यक्ष कामात आलेल्या अडचणी, रिजेक्शन, मशिनमधील बिघाड, निर्माण झालेला एकंदर बॅकलॉग अशा अनेक गोष्टींचा एकत्र आढावा घेऊन पुढच्या दिवसांचे नियोजन आणि वेळापत्रक तयार होते. यामध्ये अर्थातच स्टोअरमधील स्टॉक, एकूण इन्व्हेंटरी इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात आणि ऑपरेटरला पुढील दिवसाचे आणि तासातासांचे वेळापत्रकही देता येते. पुरवठादारांना वेळापत्रक देता येते. पुढील कार्याच्या सूचना आधीच मिळत असल्यामुळे योग्य टूल आणि योग्य मटेरियल शोधण्यातील वेळ वाचतो. आजवर लहान उद्योगांमध्ये हे सर्व कार्य सुपरवायजर आणि व्यवस्थापकाच्या अनुभवावर चालत असते. नवीन यंत्रणेद्वारा या परिस्थितीतील संभाव्य चुका टाळल्या जातात आणि आपोआपच उत्पादनक्षमता वाढते. कारखान्यामध्ये असलेली मशिन, मनुष्यबळ, प्रत्यक्ष उत्पादनाचा वेळ अशा गोष्टींवर संपूर्ण कारखान्याची क्षमता अवलंबून असते. बर्‍याच वेळी या क्षमतेची योग्य कल्पना संबंधितांना नसते. प्लँट मॅनेजर प्रणालीमुळे या सर्व बाबींची अचूक माहिती नियोजनासाठी उपलब्ध होते. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनाला या माहितीचा चांगला उपयोग होतो. या प्रणालीच्या विकसन प्रक्रियेच्या दरम्यान सुमारे 10 हजार निरनिराळ्या प्रकारच्या परिस्थितींचा अभ्यास अंतर्भूत झालेला असल्याने विविध उद्योगांमध्ये सहजी लागू होणारी अतिशय महत्त्वाची आणि चपखल यंत्रणा आपल्याला मिळू शकते. 
 
या यंत्रणेमुळे उद्योगांची ग्राहकाभिमुखता कशी वाढते याची दोन उदाहरणे देता येतील. एक म्हणजे, एखाद्या उद्योगामध्ये एक नवीन ऑर्डर मिळत असेल तर ती आपण कधी पूर्ण करू शकतो याची पूर्ण माहिती प्लँट मॅनेजरमध्ये मिळू शकते. त्यामुळे नवीन ऑर्डरची पूर्तता करण्याचे वचन सहज देता येते. दुसरे म्हणजे, बर्‍याच वेळा ग्राहक आपल्या ऑर्डरचे काय झाले याची माहिती घेत असतो. अशा एखाद्या प्रसंगी कारखान्यातील दोन वेगवेगळ्या जबाबदारीतील व्यक्तींना त्याच ऑर्डरची माहिती विचारली आणि पूर्ण कधी होणार हे विचारले, तर साधारण परिस्थितीत लोक अंदाजे उत्तर देतात आणि ते उत्तर वेगवेगळे असल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतात. परंतु, या दोघांकडेही जर प्लँट मॅनेजर प्रणाली उपलब्ध असेल, तर ऑर्डर नंबर टाकून त्या ऑर्डरची सध्याची परिस्थिती आणि पूर्ण होण्याची वेळ याचे अचूक उत्तर मिळते आणि सर्व अधिकारी वर्गामध्ये एकवाक्यता राहते. अर्थातच, योग्य माहितीने ग्राहकांचे समाधान होते. आपणाला हवे असल्यास संबंधित ग्राहकही या प्रणालीचा वापर करून आपल्या ऑर्डरची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे पाहू शकतात. यामुळे संपूर्ण विश्वासाचे वातावरण तयार होते, अर्थातच उद्योगाची वाढ होते. 
 
प्रणाली कार्यान्वित करतानाचे टप्पे
 
प्रथम सध्याच्या व्यवस्थेची पूर्ण माहिती घेऊन प्लँट मॅनेजर तेथे वापरता येईल याची खात्री करून घेतो. आमचे सॉफ्टवेअर वापरण्याची यंत्रणा उपलब्ध असल्याची खात्री करतो. आमची प्रणाली कशी चालते याचे प्रात्यक्षिक देतो. 
कामाची व्याप्ती आणि आर्थिक बाबी ठरल्यानंतर त्याचा कच्चा आराखडा तयार करतो. ग्राहकाशी झालेल्या चर्चेनुरुप त्यात बदल होतात. 
अंमलबजावणी सुरू होताना त्या उद्योगातील उत्पादन व्यवस्थेची संपूर्ण माहिती संग्रहित केली जाते. या कामामध्ये आमचा एक तज्ज्ञ ग्राहकांना मार्गदर्शन करून योग्य माहिती जमा झाल्याची खात्री करतो. 
प्रणाली तयार झाल्यावर आम्ही आमच्याकडे तिची तपासणी करून यंत्रणेची खात्री करून घेतो. 
ग्राहकाच्या उद्योगामध्ये प्रणाली प्रत्यक्ष वापरात आणताना आम्ही पहिल्या तीन दिवसांमध्ये प्रोजेक्ट टीम आणि त्यांच्यातील ठराविक व्यक्तींना प्रशिक्षण देणे, डमी ऑर्डर करून प्रात्यक्षिक देणे, प्रत्यक्ष ऑर्डर प्रणालीमध्ये वापरणे इत्यादी गोष्टी अंमलात आणतो. 
पुढील तीन दिवसांमध्ये प्रत्यक्ष प्रणाली वापरात आणण्यासाठी आमचा तज्ज्ञ मदत करतो. व्यवस्थापनासाठी उपयोगी असे अहवाल, आलेले प्रश्न, नवीन काही मागण्या इत्यादींचा परामर्श घेतला जातो. 
प्रणाली कार्यान्वित झाल्यावर काही दिवसांनी आमचा तज्ज्ञ पुन्हा दोन दिवसांसाठी भेट देऊन पुनश्च प्रशिक्षण देणे, प्रणालीचा पूर्ण वापर होत आहे ना हे पाहणे याचे निरीक्षण करून व्यवस्थापनाला अहवाल सादर करतो. 
काही काळानंतर पुन्हा एक दिवसाची भेट देऊन संपूर्ण यंत्रणेचे परीक्षण करून अहवाल देतो. 
 
हे सर्व काम ग्राहकांच्या सोयीनुसार सुमारे तीन महिन्यांत पूर्ण होते. या यंत्रणेतील सर्व माहिती आमच्या अ‍ॅमेझॉन क्लाउडवर अत्यंत सुरक्षितरित्या संग्रहित केली जाते. ग्राहकांना हवे असल्यास ते स्वतःचा सर्व्हरदेखील वापरू शकतात. उद्योगामध्ये काळानुरुप होणारे चांगले बदल, ट्रेंड इत्यादींचा परामर्श या यंत्रणेत घेतला जातो. दीर्घकालीन उत्पादन प्रक्रियेची माहिती, होणारे रिजेक्शन, ऑपरेटरची सुयोग्य माहिती, प्रकियेत होणार्‍या सुधारणा वगैरेंचा विचार करून पुढील नियोजन केले जात असल्यामुळे व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी अत्यंत तत्पर अशी माहिती यंत्रणा निर्माण होते.
 
ग्राहकाचा अनुभव 
 
आमच्या एका ग्राहकाकडे 12 मशिन आहेत. मालक आणि मॅनेजर यांचे उत्पादन प्रक्रियेबाबतचे वेगवेगळे अंदाज असल्यामुळे त्यांच्याकडून ग्राहकांना ऑर्डरविषयी निरनिराळे अंदाज जात असत आणि त्यामुळे ग्राहकांचा विश्वास विचलित होत असे. आमची प्रणाली वापरात आणल्यानंतर काही काळामध्येच यामध्ये पूर्ण सुधारणा झाली. पुरवठादारांना वेळापत्रक जाऊ लागले. कारखान्यातील निरनिराळ्या टप्प्यांवरील माहिती एकत्रित येत असल्यामुळे उत्पादनात सुधारणा झाली. त्यांची वेळेत काम करण्याची (OTD) टक्केवारी आधी 40 ते 45 होती, त्यात लक्षणीय सुधारणा होऊन ती 90-95 टक्के झाली. त्यांचा ग्राहक असलेल्या उद्योग समूहाला ही सुधारणा अनपेक्षित होती. त्यामुळे त्यांना त्याच ग्राहकाकडून रिपीट ऑर्डर तर मिळाल्याच पण त्यांच्या इतर यंत्रभागांचेही काम मिळू लागले. 
 
आजवर 40 हून अधिक उद्योग या प्रणालीचे ग्राहक आहेत. ही प्रणाली वापरण्यापासून एकूण नियोजन पद्धतीत 100 टक्के वाढ, उत्पादनामध्ये सुमारे 30 टक्के वाढ, इन्व्हेंटरी आणि स्टॉकमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक बचत इत्यादी फायदे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. आमच्याकडे ग्राहकसेवा प्रणालीदेखील कार्यान्वित आहे. ग्राहकाला काही अडचण निर्माण झाल्यास आमच्या प्रणालीमध्ये त्याची तात्काळ नोंद होते आणि अर्ध्या तासाच्या आत ग्राहकाला पहिला प्रतिसाद दिला जातो. सर्व तक्रारी वेळेत सोडविल्या जातात ना यासाठी वेगळी प्रणाली कार्य करते.
 
व्यवस्थापनाला ठराविक कालांतराने मिळणार्‍या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिममुळे (MIS) मशिन बंद असल्याचे प्रमाण, मशिनचा वापर, रिजेक्शन, रिवर्क, ऑपरेटरची क्षमता इत्यादी माहिती प्रत्येकातील महत्त्वाच्या कारणांसह पुरविली जाते. या सर्व प्रक्रियेमुळे एकूण व्यवस्थापनावर पडणार्‍या माहिती आणि विश्लेषणाचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो आणि प्रत्यक्ष सकारात्मक बदल करण्यासाठी त्यांना योग्य वेळ देता येतो. अर्थातच यामुळे उद्योगाची भरभराट होते हे निश्चित!
 

T1_1  H x W: 0  
 

T2_1  H x W: 0  
 
केस स्टडी
 
चाकण येथील व्हॉल्व्हवर्क्स या कंपनीमध्ये प्लांट मॅनेजर प्रणाली कार्यरत आहे. त्याच्या वापराविषयी बोलताना कंपनीचे प्लांट व्यवस्थापक अमर शितोळे यांनी सांगितले की, “कारखान्यामध्ये प्रक्रिया करताना विविध सेटअप असल्यामुळे वेळेत पुरवठा करण्याची (ऑन टाइम डिलिव्हरी) पद्धत खूप गुंतागुंतीची होती. सर्व डाटा एक्सेल शीटवर घेऊन काम करताना नियोजनामध्ये चुकांचे प्रमाण जास्त होते. मात्र, प्लांट मॅनेजर प्रणालीचा वापर सुरू केल्यापासून हे काम खूप सोपे झाले आहे. 
 
या प्रणालीमुळे प्रत्येक दिवसाचे नियोजन मिळते आणि प्रत्यक्ष उत्पादनाची माहिती पुरविल्यानंतर काही मिनिटांमध्येच पुढील वेळापत्रक तयार होते. यामुळे नियोजनातील अडचणी कमी झाल्या. याचा परिणाम म्हणजे वेळेत पुरवठा करण्याचे प्रमाण सुमारे 50 टक्के होते ते 75 टक्क्यांपर्यंत वाढले. याशिवाय प्रत्यक्ष उत्पादनामध्ये येत असलेल्या त्रुटींवर प्लांट मॅनेजर प्रणालीमुळे मार्गदर्शन होते. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा योग्य पद्धतीने करता येत असल्याने उत्पादनाची कार्यक्षमता 50 टक्क्यांवरून 90 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
 
नियोजनानंतर उत्पादनात आलेल्या त्रुटी नक्की कोणत्या कारणाने आल्या याची माहिती आपल्या मागणीनुसार तात्काळ मिळते. त्यामुळे कोणत्या सुधारणा आधी करणे आवश्यक आहे ते कळते. उदाहरणार्थ, आमची 3 महिन्यांची माहिती एकत्र पाहिल्यावर असे दिसून आले की, वीज नसल्यामुळे जास्तीतजास्त त्रुटी येत आहेत. या माहितीमुळे आम्ही जनरेटर सेट विकत घेतला. यामुळे वाया जाणारा वेळ वाचला आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.”
 
ग्राहकाने नियोजनामध्ये अचानक काही बदल केल्यास त्याचे उत्पादन कमी करता येईल आणि त्याचबरोबर इतर उत्पादनावर त्याचा काय परिणाम होईल याबाबत अचूक उत्तर मिळते. त्यामुळे ग्राहकाचा आमच्यावरील विश्वास वाढला.
 
 
 

Niraj Wanikar_1 &nbs 
नीरज वणीकर
व्यवस्थापकीय संचालक
सी.एन.सी. टाइम्स प्रा.लि. 
9823078615
 
 
नीरज वणीकर यांत्रिकी अभियंते असून, सी.एन.सी. टाइम्स प्रा.लि. कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना CAD, CAM, CAE, CNC आणि इन्स्पेक्शन टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.