समतल पृष्ठभाग मिलिंग फिक्श्चर

Udyam Prkashan Marathi    31-Jan-2020   
Total Views |


धातुकामचा फेब्रुवारी 2020 अंक खास मिलिंग प्रक्रियेशी संबंधित असल्याने समतल पृष्ठभागाचे मिलिंग कसे करावे याची माहिती या लेखात देणे सयुक्तिक ठरते. समतल पृष्ठभागाच्या मिलिंगसाठी कार्यवस्तू पकडणे हेच मुळात आव्हानात्मक असते. जर थोड्या प्रमाणात कार्यवस्तू बनवायच्या असतील तर ते काम कार्यवस्तू वाइसमध्ये पकडून करता येईल. परंतु प्रत्येक कार्यवस्तू सेट करण्यात बराच वेळ जाईल. या पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य नाही. यासाठी वेगळ्याच प्रकारचे फिक्श्चर बनवावे लागेल. कार्यवस्तुचा वरचा पृष्ठभाग यंत्रण करावयाचा असल्यामुळे त्या पृष्ठभागावर क्लॅम्प करणे शक्य नाही, आणि हेच आपल्यापुढील खरे आव्हान आहे.
 
चित्र क्र. 1 मध्ये दाखविलेल्या कार्यवस्तूचा खालचा पृष्ठभाग ‘क्ष’ यंत्रण केलेला आहे. आपण पृष्ठभाग ‘क्ष’ वर ठेवून वरचा पृष्ठभाग यंत्रण करण्यासाठी मिलिंग फिक्श्चर कसे करायचे ते पाहू. या कार्यवस्तुला घट्ट पकडण्यासाठी फक्त वरचा पृष्ठभागच उपलब्ध आहे. परंतु, हाच पृष्ठभाग यंत्रण करावयाचा असल्यामुळे कार्यवस्तू घट्ट कशी पकडावी हा कळीचा मुद्दा आहे. आता आपण या फिक्श्चरचा अधिक तपशिलात विचार करू.
 
बेस प्लेट
 
बेस प्लेटवर फिक्श्चरचे (चित्र क्र. 2 आणि 3) बाकीचे भाग बसविले जातात. बेस प्लेट मिलिंग मशिनच्या टेबलवर ‘T’ बोल्टच्या साहाय्याने पकडली जाते. या फिक्श्चरला फेस मिलिंग फिक्श्चर असेही म्हणतात. अशा प्रकारच्या फिक्श्चरमध्ये टेनन देण्याची गरज नसते, कारण कटरच्या एकाच पासमध्ये यंत्रण करणे श्रेयस्कर असल्यामुळे सहसा कार्यवस्तुच्या रुंदीपेक्षा कटर मोठा असतो. त्यामुळे फिक्श्चर मशिन टेबलवर बसविताना थोडे तिरके बसले तरी काही समस्या येत नाही. फिक्श्चर तिरके होण्याचे कारण बहुतेक वेळा क्लॅम्पिंग खाचा (स्लॉट) मशिन टेबलच्या ‘T’ खाचेपेक्षा 3 ते 4 मिमी.ने मोठ्या असतात. 
 

1_1  H x W: 0 x 
 
रेस्ट पॅड
 
रेस्ट पॅड कठीण (हार्ड) केलेली असतात. ज्या पृष्ठभागावर कार्यवस्तू ठेवली जाते तो पृष्ठभाग एका पातळीत आणण्यासाठी ग्राइंड करून घेतला जातो. असे केल्यामुळे कार्यवस्तुचा आधी यंत्रण झालेला पृष्ठभाग आणि सध्या करत असलेला पृष्ठभाग एकमेकांना समांतर मिळतात. एका कार्यवस्तूचे यंत्रण झाल्यावर दुसरी कार्यवस्तू पॅडवर ठेवण्याआधी पॅड साफ करणे आवश्यक आहे.
 
एज लोकेटर
 
डाव्या बाजूला एज लोकेटर बसविलेला आहे आणि उजव्या बाजूला क्लॅम्प बसविलेला आहे. एज लोकेटरला सरेशन दिलेली आहेत. जेव्हा कार्यवस्तू क्लॅम्प केली जाते तेव्हा हे दाते कार्यवस्तुला करकचून पकडतात. कारण हे दाते कार्यवस्तुच्या पृष्ठभागामध्ये घुसतात. हा पृष्ठभाग रफ (उदाहरणार्थ, कास्ट, फोर्ज) असतो. गरज असल्यास नंतर यंत्रण केले जाते. हा एज लोकेटर बेस प्लेटच्या लांबीशी लंबरूप बसला आहे. तसेच एका गोल पिनमुळे कार्यवस्तू पिनला मागे जाऊन टेकते. अशाप्रकारे कार्यवस्तू फिक्श्चरमध्ये चांगल्याप्रकारे लोकेट झालेली आहे. एज लोकेटरचा वरचा फेस ग्राइंड केलेला आहे. हा पृष्ठभाग सेटिंग पीस म्हणून वापरला आहे. 3.0 मिमी.ची फिलर वापरली की आपल्याला कार्यवस्तुची अचूक जाडी मिळेल. या एज लोकेटरवर 3.0 मिमी.ची फिलर ठेवायची आणि त्यावर कटर सेट करायचा. सेटिंग पीसचा वापर कसा करायचा हे आपण पूर्वीच्या अंकात शिकलो आहोत. हा कटर यंत्रण करताना क्लॅम्पकडून एज लोकेटरकडे जातो. त्यामुळे यंत्रणाचे बल एज लोकेटरवर येते. हे बल कधीही क्लॅम्पवर येऊ नये. यासाठी चित्र क्र. 4 पहा.
 

2_1  H x W: 0 x 
 

3_1  H x W: 0 x 
 
क्लॅम्प 
 
चित्र क्र. 5 मध्ये क्लॅम्पची अ‍ॅसेम्ब्ली दाखविली आहे. या क्लॅम्पला पुढच्या बाजूस बेस प्लेटला समांतर सरेशन दिलेली आहेत. क्लॅम्पला दिलेला हेक्स बोल्ट जेव्हा आपण घट्ट करतो तेव्हा क्लॅम्पचा पुढचा दातेरी भाग खाली येता येता पुढेदेखील येतो, कारण हालचालीचा केंद्रबिंदू खाली आहे. त्यामुळे कार्यवस्तू खालच्या दिशेने दाबली जाते. त्याचवेळी कार्यवस्तू डावीकडे म्हणजेच एज लोकेटरकडे ढकललीसुद्धा जाते. क्लॅम्पवरील दाते कार्यवस्तुच्या उभ्या पृष्ठभागामध्ये घुसून कार्यवस्तूवर परिणामकारक पकड मिळते. या क्लॅम्पची स्थिती मागे पुढे करता यावी म्हणून क्लॅम्पच्या प्लेटवर दोन खाचा दिलेल्या आहेत. मात्र, एकदा ही स्थिती सेट केली की वारंवार हलवावी लागत नाही. तसेच क्लॅम्पच्या पुढच्या भागात दाते असलेले कठीण पॅड दिलेले आहे. हे दाते झिजून झिजून बोथट होऊ नयेत म्हणून हे पॅड कठीण केलेले आहेत. जर कठीण पॅडचा वापर मोठ्या प्रमाणात असेल, तर या कठीण पॅडचे प्रमाणीकरण करणे किफायतशीर ठरते. क्लॅम्पचा घट्ट केलेला स्क्रू ढिला केला की क्लॅम्प त्याच्या वजनानेच खाली पडेल, म्हणजेच दातेरी कठीण पॅड मागे येईल आणि कार्यवस्तू फिक्श्चरमधून बाहेर काढता येईल.
 

4_1  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 5 मध्ये एक कठीण स्टेप पिन दिसत आहे. जेव्हा क्लॅम्पिंग स्क्रू घट्ट केला जातो तेव्हा या स्टेप पिनवर तो घासतो आणि म्हणूनच स्टेप पिन कठीण केली जाते. तसेच एक थ्रेडेड बुश दिलेला आहे, कारण हा स्क्रू वारंवार वर खाली होत असल्याने क्लॅम्पची झीज होऊन क्लॅम्पच बदलावा लागेल. अर्थात थ्रेडेड बुश जर झिजले तर ते बनविणे क्लॅम्प बनविण्यापेक्षा सोपे आणि कमी खर्चिक आहे. हे थ्रेडेड बुश क्लॅम्पमध्ये प्रेस फिट बसविले आहेत आणि कार्यवस्तू क्लॅम्प करताना थ्रेडेड बुश फिरू नयेत म्हणून डॉवेल बसवून थ्रेडेड बुश फिरण्याची शक्यताच नाहीशी केली आहे. क्लॅम्पिंग स्क्रूचे डोके मिलिंग कटरच्या पातळीपेक्षा खाली ठेवणे आवश्यक आहे.
 
मिलिंग करताना आपण सुरक्षिततेसंबधी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत ना, हे बघणे कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. याचा उहापोह आपण करू.
 
1. मिलिंग मशिनचे टेबल आणि फिक्श्चर साफ करण्याकरिता ब्रशचा वापर करावा. हाताचा किंवा दाबयुक्त हवेचा वापर करू नये. दाबयुक्त हवेचा वापर केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. लोखंडाच्या चिपमुळे जखम होऊ शकते किंवा त्या डोळ्यात जाण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी संरक्षक चष्मे (सेफ्टी गॉगल) वापरणे आवश्यक आहे.
2. मशिनच्या टेबलच्या ‘T’ खाचेमधील चिप काढण्यासाठी चिप रेक/‘T’ खाच क्लीनरचा (चित्र क्र. 6) वापर करावा.
 

5_1  H x W: 0 x 
 
3. कटर फिरत असताना त्याला हात लावू नये.
4. कटर, आर्बर बदलणे किंवा अवजड वस्तू हाताळताना एखाद्या कर्मचार्‍यास मदतीस घ्यावे. 
5. कटर बदलताना जाड हातमोजे वापरावे जेणेकरून कटरची टोके हाताला लागणार नाहीत.
6. आर्बर बसविताना आर्बरचा नट आवळण्यासाठी मशिनच्या मोटरचा आर्बर फिरविण्यासाठी वापर करू नये.
7. मशिनच्या टेबलवर व्हर्निअर, स्क्रू ड्रायव्हर अशा वस्तू ठेवू नयेत.
8. यंत्रण करताना ज्या चिप उडतात त्या गरम असतात आणि अशा चिप डोळ्यात गेल्यास कर्मचारी अंध झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून प्रत्येक कर्मचारी काम करताना चष्मा वापरतो की नाही हे पाहणे पर्यवेक्षकाची जबाबदारी आहे. 
9. मिलिंग करताना जर शीतकाचा वापर होत असेल तर शीतक बाहेर जमिनीवर पडणार नाही अशी व्यवस्था आवश्यक आहे. 
10. मिलिंग करताना चिप दूरवर उडतात. हे टाळण्यासाठी संरक्षकाची व्यवस्था करावी आणि कर्मचार्‍याने त्याचा वापर करणे बंधनकारक आहे. 
11. हातमोजांचा वापरसुद्धा बंधनकारक आहे. नुसत्या हाताने चिप कधीही हाताळू नयेत.
प्रत्येकाने योग्य व्यक्तिगत सुरक्षा साधनांचा (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट-PPE) वापर केलाच पाहिजे. 
सुरक्षित यंत्रण करण्यासाठी काही सूचना वर दिलेल्या आहेत. जर आपण योग्य काळजी घेतली तर यंत्रण करणे सुरक्षित होते. 
 
 

ajit deshpande_1 &nb 
अजित देशपांडे 
9011018388
 
अजित देशपांडे यांना जिग्ज आणि फिक्श्चर्स बनविण्याचा जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी किर्लोस्कर, ग्रीव्हज् लोम्बार्डिनी लि., टाटा मोटर्स अशा विविध कंपन्यांत काम केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते अतिथी प्राध्यापक आहेत.