आमच्याबद्दल

Udyam Prkashan Marathi    08-Jan-2020
 
लघु, मध्यम आकाराच्या कारखान्यातील तंत्रज्ञांना अद्ययावत अभियांत्रिकी ज्ञान आणि माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी अभियांत्रिकीसंबंधित तांत्रिक पुस्तके आणि मासिके प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करण्याच्या उद्देशाने ‘उद्यम प्रकाशन’ ही संस्था काम करीत आहे. या दृष्टीने आम्ही जून 2017 मध्ये ‘धातुकाम’ नावाचे मराठी भाषेतील मासिक सुरू केले आणि नोव्हेंबर 2018 पासून ‘लोहकार्य’ मासिक कन्नड आणि ‘धातुकार्य’ मासिक हिंदी या दोन भाषांतून प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. 
 
तंत्रज्ञानविषयक मासिके बाजारपेठेतील नवीन तंत्रज्ञान, संबंधित क्षेत्रात होणारे नवीन प्रयोग, नवीन साधने आणि उपकरणे याविषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करून त्यांचे योगदान देतात. कोणत्याही मासिकाचा नवीन अंक आला की, तो वरवर तरी चाळून पाहण्याची पद्धत सामान्यपणे सगळीकडे असते. अशा मासिकातील आवडलेल्या किंवा एखाद्या विशिष्ट आशयासंदर्भात मित्र आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा केली जाते. अशा प्रकारे उद्योगातील ग्राहकांमध्ये तांत्रिक नवीन माहिती पसरते. यामुळेच ‘उद्यम’ने प्रादेशिक भाषेत पुस्तकांसह मासिके प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मराठीमधील ‘धातुकाम’, हिंदीमधील ‘धातुकार्य’ आणि कन्नडमधील ‘लोहकार्य’ ही आमची मासिके ‘मॉडर्न मशिन शॉप’, ‘अमेरिकन मशिनिस्ट’ किंवा ‘फेर्टिगुंग’ यांसारख्या युरोपिअन किंवा अमेरिकन मासिकांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीसतोड आहेत. मशिन टूलचा वापर करून यंत्रण केलेल्या भागांचे उत्पादन करण्याच्या सर्व आधुनिक तंत्रांची अद्ययावत माहिती वाचकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविणे हे या मासिकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मासिकामध्ये प्रक्रिया सुधारणा, नवीन उत्पादने, नवीन प्रक्रिया आणि कारखाना सुधारणांची माहितीदेखील दिली जाते. या मासिकाच्या प्रत्येक अंकातून कामगार, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांना उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
महाराष्ट्रातील सुमारे 16,000 लघु, मध्यम उद्योगांमध्ये ‘धातुकाम’ हे मराठी मासिक, कर्नाटकातील 10,000 लघु, मध्यम उद्योगांमध्ये कन्नड मासिक आणि दिल्लीसह उत्तर भारतातील 15,000 कंपन्यामध्ये हिंदी मासिक सध्या पोहोचत आहे. याचा निश्चितच उल्लेखनीय परिणाम झाला असून वाचकांकडून या मासिकाचे स्वागत झाले आहे. येणाऱ्या काही महिन्यांतच गुजराती आणि तमिळ या आणखी दोन भाषांत अशीच मासिके सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
 
आपण ही सर्व मासिके www.udyamprakashan.com या आमच्या वेबसाइटवर वाचू शकता.
 
संपूर्ण भारतात हजारोंहून अधिक लघु, मध्यम अभियांत्रिकी औद्योगिक युनिट पसरलेली आहेत. या युनिटमध्ये चांगल्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असली, तरी कारखान्यातील बहुतेक कामगार आणि ऑपरेटर यांना इंग्रजी भाषेचे फारसे ज्ञान नसते. या कामगार वर्गाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण द्यायचे असल्यास स्थानिक भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. अर्थात, त्यासाठी योग्य पुस्तके फार महत्त्वाची आहेत. म्हणून या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणार्‍यांना उपयोगी ठरू शकणार्‍या पुस्तकांवर आमचा पुस्तकांचा विभाग काम करीत आहे. ही पुस्तके कारखान्यातील कामकाजाच्या चांगल्या पद्धती शिकविण्यासाठी मदत करू शकतात. सध्या मेकॅनिकल हँडबुक, सुलभ यंत्रशाळा, प्रगत यंत्रशाळा आणि अॅसेंब्ली-डिसअॅसेंब्ली ही 4 पुस्तके तयार करण्याचे काम चालू आहे. ही पुस्तके कारखान्यातील काम 'नॉलेजेबल वर्किंग' करून कामगिरी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.
 
व्यावसायिक अभियंत्यांचा एक कार्यगट ‘तंत्रज्ञाच्या मातृभाषेत अभियांत्रिकी ज्ञान आणि माहिती’ रुजविण्यासाठी उत्साहाने आणि निश्चित ध्येयाने यावर काम करीत आहे. विविध कार्यक्षेत्रात नाव कमावलेले अनुभवी अभियंते या कामासाठी ‘उद्यम’ बरोबर जोडले गेले आहेत. मासिक/पुस्तक तयार करण्यासाठी आवश्यक सर्व आधुनिक संसाधने आमच्या कार्यालयातच उपलब्ध असल्याने आशय आणि मांडणी या दोन्हींचा दर्जा आंतरराष्ट्रीय मासिके/पुस्तकांच्या तोडीचा ठेवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न चालू असतो.