रोटरी टेबल हाउसिंगच्या उत्पादकतेत वाढ

Udyam Prakashan Marathi    17-Feb-2020
Total Views |
 
इंद्रदेवबाबूंनी 1986 मध्ये सुरू केलेल्या युकॅम या स्वदेशी कंपनीने एका लहानशा कार्यशाळेपासून, रोटरी टेबलचे भारतातील सर्वात मोठे निर्माते होण्यापर्यंत विलक्षण प्रगती केली आहे. सतत विकास करण्याच्या प्रवासात, युकॅमने नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची मानसिकता ठेवली आहे. सर्वोत्तम कार्यपद्धती शोधत राहणे आणि त्यांचा अवलंब करणे, हेच कंपनीचे ब्रीद आहे.
 
इतिहासाचा भाग होण्याची आकांक्षा
 
गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय उत्पादकता परिषदेमध्ये (नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी समिट, एन.पी.एस.) आम्ही सहभागी होत आहोत. यशस्वी कंपन्यांनी उत्पादकता वाढविण्यासाठी कोणत्या अभिनव आणि प्रभावी उत्पादन पद्धतींचा अवलंब केला, त्याबद्दल जाणून घेण्यासाठी एन.पी.एस. हे एक उपयुक्त असे व्यासपीठ असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. कंपनीतील जे वरिष्ठ अधिकारी गेल्या परिषदेमध्ये सहभागी झाले होते, त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्पर्धक संघांकडून ऐकलेल्या गोष्टी अंमलात आणण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये आम्हाला IMTMA कडून IMTMA - एस मायक्रोमॅटिक प्रॉडक्टिव्हिटी चॅम्पियनशिप पुरस्कार 2019, या स्पर्धेत भाग घेण्याचे आमंत्रण मिळाले. उत्पादन प्रक्रियेमधील उल्लेखनीय प्रयत्नांसाठी आणि नवनव्या क्षेत्रात यशस्वी उपक्रम, नवीन मापदंड प्रस्थापित करणार्‍या अथवा सध्याच्या प्रस्थापित संकल्पनांना आव्हान देणार्‍या, सर्वोत्कृष्ट कार्याचे कौतुक करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांमुळे कंपन्यांना बाजारपेठेत स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची संधीही मिळते. मागील दोन वर्षांत आम्ही ‘निरंतर सुधारणा’ या मार्गाने आमच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असल्याने आम्ही यावेळी स्पर्धेत भाग घेण्याचा विचार केला. 
 
एन.पी.एस.मध्ये आमच्या केस स्टडीची निवड
 
आमच्याकडे केलेल्या सुधारणेचे तपशील आम्ही परीक्षकांना पाठविल्यानंतर लघु, मध्यम क्षेत्रातील 24 पैकी 3 प्रतिस्पर्ध्यांची अंतिम यादीमध्ये निवड झाली. त्यामध्ये आमच्या युकॅम कंपनीचा समावेश होता.
 

1_1  H x W: 0 x 
 
यंत्रणासाठी कार्यवस्तू अपेक्षित अक्षात फिरविणारी रोटरी टेबल (चित्र क्र. 1) आम्ही बनवितो. दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक बदल करणे अपरिहार्य होते. 2017-18 मध्ये बाजार तेजीत असल्यामुळे रोटरी टेबलच्या मागणीत अचानक वाढ झाली. वाहन क्षेत्र आणि त्यासंबंधित उद्योगातील विक्री विक्रमी होती. त्यामुळे युकॅमकडे उत्पादनाच्या मागणीची संख्या प्रत्येक महिन्यात वाढत होती. त्याच्यावर विचार करताना विशेष लक्ष देण्यासारख्या पुढील बाबी आमच्या समोर आल्या.
 
> 2016-17 च्या तुलनेत, मागणीमध्ये जवळपास 37.5% वाढ (आलेख क्र. 1)
आयात केलेली गुणवत्तापूर्ण रोटरी टेबल भारतीय किंमतीला स्पर्धात्मक
गुणात्मक सुधारणा
 

2_1  H x W: 0 x 
 
वरील मुख्य गोष्टी ध्यानात घेऊन काही बहु विभागीय कार्यगट (क्रॉस फंक्शनल टीम) तयार करण्यात आले. आवर्तन काळ (सायकल टाइम) कमी करणे आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने कारणमीमांसा केल्यानंतर काही ठळक मुद्दे समोर आले ज्यामध्ये सुधारणा आवश्यक होत्या. 
 
उत्पादन वाढविण्यासाठी आमच्याकडे एक व्ही.टी.एल. आणि एक एच.एम.सी. वाढविण्याचा सुमारे 5 कोटी खर्च असलेला पर्याय समोर आला परंतु त्यावर व्यवस्थापनाने स्पष्टपणे नकार दिला. “आपल्याकडे आधीपासूनच जास्त क्षमता आहे, खरं तर, आम्हाला असं वाटतं की, कारखान्यातील पायाभूत सुविधांचा वापर करायला हवा तितका केला जात नाही”, असे कंपनी व्यवस्थापनाचे मत होते. त्यामुळे व्यवस्थापनाने संपूर्ण प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करण्याचे काम उत्पादन विभागातील व्यवस्थापकांना दिले. व्यवस्थापनाने दिलेले काम आव्हान म्हणून स्वीकारत उत्पादन विभागाने त्यावर काम सुरू केले. त्यानंतर वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे कार्यगट काम करू लागले. उत्पादन साखळीत ‘हाउसिंग’चे (चित्र क्र. 2) उत्पादन हे एक मोठे ‘बॉटलनेक’ असल्याचे लक्षात आले आणि तो यंत्रभाग महत्त्वाचा असल्याने त्याचे यंत्रण कारखान्यातच केले जात होते. या कामाला जास्त वेळ लागत होता. हाउसिंगच्या उत्पादनाचा आवर्तन काळ कमी करण्याच्या उद्देशाने अभिरुधी कडेगे यांनी वेगळा कार्यगट तयार करून या प्रकल्पावर काम सुरू केले. 
 

3_1  H x W: 0 x 
 
समस्या सोडविण्यासाठी प्रथम हाउसिंग जिथे बनते तिथे जाऊन कार्यगटाने जास्त वेळ लागण्याची 19 संभाव्य कारणे शोधून काढली आणि माणूस, मटेरियल, पद्धत आणि मशिन (तक्ता क्र. 1) या उत्पादनाच्या चार महत्त्वाच्या घटकांमध्ये त्यांची विभागणी केली. 
 

4_1  H x W: 0 x 
 
यानंतर तज्ज्ञांसोबत चर्चा करून हाउसिंगच्या उत्पादनावर जास्तीतजास्त प्रभाव असलेली 5 कारणे (तक्ता क्र. 2) त्यातून वेगळी केली. 
 

5_1  H x W: 0 x 
 
ही 5 कारणे डिझाइन आणि उत्पादन या दोन प्रमुख विभागांशी संबंधित असल्याचे समोर आले. डिझाइन विभागाने व्हॅल्यू इंजिनिअरिंग आणि कास्टिंगमधील अतिरिक्त मटेरियल (स्टॉक) कमी करणे, या दोन बाबींवर काम केले. उत्पादन विभागामधील कारणांमध्ये सुधारणा केल्यास आवर्तन काळ कमी होऊ शकतो हे लक्षात आल्यावर आम्ही कामाला सुरुवात केली. 
 
1. यंत्रण वेळ कमी करणे 
 

6_1  H x W: 0 x 
 
यंत्रण वेळ कमी करण्यासाठी कास्टिंगमध्ये अतिरिक्त मटेरियल कमी ठेवणे आवश्यक आहे. आधीच्या पद्धतीमध्ये लाकडी पॅटर्न होते. त्यासाठी मटेरियल खूप ठेवायला लागायचे शिवाय पृष्ठीय (सरफेस) फिनिशही साधारणच असायचा. यावर उपाय म्हणून अल्युमिनिअमचे पॅटर्न (चित्र क्र. 3) तयार केले. त्यामुळे कास्टिंगमध्ये कमीतकमी अतिरिक्त मटेरियल ठेवता येऊ लागले. अतिरिक्त मटेरियल कमी झाल्यामुळे यंत्रणाचा वेळ कमी झाला आणि पृष्ठीय फिनिशमध्ये खूप सुधारणा झाली. उत्पादकतेमध्ये गुणवत्तापूर्ण पुनरावर्तनक्षमता मिळू लागली.
 
2. यंत्रणाचा सेटअप कमी करणे
 

7_1  H x W: 0 x 
 
यंत्रणाचा सेटअप करण्यासाठी लागणार्‍या वेळेमध्ये बचत करणे आवश्यक होते. आधीच्या पद्धतीत सॉफ्ट जॉ वापरले जात होते, तसेच व्ही.टी.एल.वर यंत्रण होत होते. त्यामध्ये चित्र क्र. 4 मध्ये दाखविल्याप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये सेटअप करावा लागायचा. परंतु तेच यंत्रण एच.एम.सी.वर केले असता, सेटअपच्या वेळेमध्ये बचत झाली. या ठिकाणी हार्ड जॉ वापरले. या बदलांमुळे आवर्तन काळ कमी होऊन उत्पादकता वाढली.
 
3. टूलिंग
 

8_1  H x W: 0 x 
 
यंत्रण करण्यासाठी एंड मिल आणि एक्स्टेन्शनसहित बोअरिंग टूल वापरात होते. त्याऐवजी कॉम्बिनेशन टूल आणि आधुनिक डिजिटल अँटी व्हायब्रेशन बोअरिंग टूलचा (चित्र क्र. 5) वापर केला. त्यामुळे टूल तुटणे तर कमी झालेच, शिवाय सेटअपमधील वेळ कमी होऊन उत्पादकताही वाढली.
 
4. क्लॅम्पिंग आणि डीक्लॅम्पिंग
 
कार्यवस्तुचे यंत्रण करताना कमीतकमी वेळेत क्लॅम्पिंग आणि डीक्लॅम्पिंग करणे आवश्यक असते. तसेच कार्यवस्तुची भौमितिक अचूकता त्‍यावर अवलंबून असतेृ चित्र क्र. 6 मध्‍ये दाखविल्‍याप्रमाणे आधी टॉप क्‍लॅम्पिंग पद्धत वापरली जात होती. 
 

9_1  H x W: 0 x 
 
पुल डाउन क्लॅम्पिंग प्रकारात कार्यवस्तू व्यवस्थित बसते आणि स्थिर राहते. हाउसिंगला अनुरूप फिक्श्चर कारखान्यातच डिझाइन केली. सध्याच्या प्रोग्रॅममधील पॅरामीटरमध्ये बदल केले. टूलचे मार्ग आणि कटिंग स्ट्रॅटेजी यांच्यात सुधारणा करीत पूर्वीच्या 5 सेटअपची संख्या कमी करून 3 वर (चित्र क्र. 7) आणली.
 

10_1  H x W: 0  
 
फायदे
 
यामुळे एका प्रकारच्या हाउसिंगचा आवर्तन काळ 460 मिनिटांवरून कमी होऊन 170 मिनिटे (63% कपात) झाला. खर्चामध्ये प्रतिवर्षी 28 लाख रुपयांची बचत झाली. प्रति हाउसिंग खर्च 37 टक्क्यांनी कमी झाला. या सुधारणा इतर हाउसिंगसाठी वापरल्यानंतर एकूण 1 कोटीहून जास्त रुपयांची बचत झाली. या सर्व सुधारणा करण्यासाठी फक्त 7.16 लाख रुपये खर्च आला. नवीन मशिन खरेदी न केल्यामुळे 5 कोटींची गुंतवणूक तर वाचलीच, कार्बन फूटप्रिंट कमी झाला आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारली. या सर्व बदलांमुळे उत्पादनाचा पुरवठा वेळेवर होण्यात लक्षणीय सुधारणा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. 
 
एक नवीन सुरुवात 
 
स्पर्धेत आमच्या संघाने चांगली कामगिरी केली. या संपूर्ण उपक्रमाने आम्हाला उत्कृष्टतेचे एक नवीनच परिमाण दाखवून दिले. यातून शिकलेल्या गोष्टी आम्ही आमच्या कार्यप्रणालीत सामावून घेतल्या. यामुळे आम्हाला आमच्या सर्व क्षेत्रातील प्रक्रियांमध्ये अधिक उत्पादकता प्राप्त करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. राष्ट्रीय उत्पादकता परिषद सर्व उद्योगातील नवनिर्मितीचे ताजे कल आणि वर्तान मानदंड यांच्याविषयी माहिती मिळण्यासाठी एक योग्य व्यासपीठ आहे. अशा कार्यक्रमांध्ये भाग घेऊन लघु मध्यम उद्योग निश्चितपणे स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात.
 
 

mrinalini_1  H  
म्रिनालीनी प्रसन्ना
प्रमुख, लर्निंग अँड डेव्हलपमेंट विभाग, युकॅम प्रा. लि.
9980212352
 
म्रिनालिनी प्रसन्ना यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी गेल्या 10 वर्षांत विविध क्षेत्रांतील लोकांना "Contineously Seeking Internal clarity in an Ever Changing Reality'' या विषयावर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे.