भविष्यातील तंत्रज्ञान मांडणारे ’ इमो 2019’

Udyam Prakashan Marathi    20-Feb-2020   
Total Views |

1_1  H x W: 0 x
 
 
धातुकामाच्या जगातील आघाडीच्या व्यापार मेळ्याचे स्थान भूषविण्याचा मान हॅनोव्हर, जर्मनी येथे भरणार्‍या ‘इमो’चा आहे. युरोपिअन असोसिएशन ऑफ द मशिन टूल इंडस्ट्रीजच्या वतीने जर्मन मशिन टूल बिल्डर असोसिएशनकडून (VDW) इमो प्रदर्शनाचे आयोजन हॅनोव्हर येथे करण्यात येते. 
 
जर्मनीत आयोजित करण्यात येणार्‍या या प्रदर्शनामध्ये एकूण प्रदर्शकांपैकी 60 टक्क्यांहून अधिक परदेशी कंपन्या असल्याने हॅनोव्हरमधील इमोला खरोखरच जगातील एक बहुराष्ट्रीय धातुकाम व्यापार मेळावा असे संबोधता येईल. हे प्रदर्शन म्हणजे अग्रगण्य असा मेळावा असल्याने याचा उपयोग परस्पर भेटी आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी एकप्रकारे नेटवर्किंग हब म्हणून केला जातो. या ठिकाणी उत्पादक आणि वापरकर्ते यांच्याकडील सर्वोच्च पातळीचे तंत्रज्ञान प्रदर्शित केले जाते.
 
इमोमध्ये सहभागी होणार्‍या प्रदर्शकांना स्वतःची नवीन उत्पादने विकसित करण्याचे वेळापत्रक इमोसोबत जुळवून घेण्याची सवय फार पूर्वीपासून लागलेली आहे. त्यामुळे उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्णय घेणार्‍यांसाठी इमो हे मुख्य संदर्भ स्थान बनले आहे. या ठिकाणी मशिन टूल आणि उत्पादन प्रणालींशी संबंधित सर्व उत्पादन क्षेत्रे आणि सेवा यांचे अतुलनीय आणि विस्तृत सादरीकरण केले जाते. ज्याला उत्पादनाचा गाभा म्हणता येईल असे यंत्रण आणि फॉर्मिंग, प्रिसिजन टूल, उपसाधने आणि नियंत्रण तंत्रज्ञान, स्वयंचलित उत्पादनासाठी आवश्यक सिस्टिम घटक आणि यंत्रभाग, इंटरकनेक्टिंग उपकरणे आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादने येथे सादर करण्यात येतात.
 
‘स्मार्ट तंत्रज्ञान देणार उद्याच्या उत्पादनाला चालना!’ (Smart technologies driving tomorrow's production) असे इमो 2019 चे घोषवाक्य होते. भविष्यातील सर्व उत्पादन योजनांमध्ये नेटवर्क सिस्टिम आणि स्मार्ट डाटा यांची अपरिहार्यता या वाक्यातून सर्वार्थाने प्रतिबिंबित होते. यावर्षीच्या इमोने पुन्हा एकदा नवकल्पनांसाठी प्रोत्साहक वातावरण निर्माण केले आहे. पुढील काही वर्षांतील उत्पादन तंत्रज्ञानातील कल काय असतील यासाठी नवीन संकल्पनांचा मंच असलेल्या इमोमध्ये त्याचा आराखडा प्रस्तुत होणे अपेक्षित होते आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा या अपेक्षांची पूर्ती झाली. इंडस्ट्री 4.0 अ‍ॅप्लिकेशन म्हणून क्लाउड बेस्ड् सिम्युलेशन टूल आणि मॉनिटरिंग सिस्टिम अशा डिजिटल सेवा समाविष्ट असणार्‍या धातुकामाच्या समग्र प्रक्रियासाखळीवर या मेळाव्यात लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तसेच IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) प्लॅटफॉर्म, अ‍ॅप, डिजिटल ट्विन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), एज आणि क्लाउड कंप्यूटिंग अशा परवलीच्या शब्दांचा इमो 2019 मध्ये सगळीकडे प्रभाव दिसून आला. संशोधन आणि प्रत्यक्ष उत्पादन या क्षेत्राशी एकमेकांशी असलेली जवळीक हे यंदाच्या इमोचे आणखी एक वैशिष्ट्य होते. या विषयाला समर्पित असलेल्या हॉल क्र. 9 मधील संबंधित प्रदर्शकांनी जगभरातील अभ्यागतांना मोठ्या संख्येने आकर्षित केल्याचे चित्र इमो 2019 मध्ये पाहण्यास मिळाले.
 
नवीन यंत्रण प्रक्रियांमध्ये बहुविध कामे (मल्टी फंक्शन) करू शकणार्‍या मशिन प्रामुख्याने मांडल्या गेल्या होत्या, तसेच यंत्रण प्रक्रियांसाठी नवीन तंत्र, सुविधा, वैशिष्ट्ये असलेली मशिन जगभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध होती. गेल्या काही वर्षांत बोलबाला झालेल्या इंडस्ट्री 4.0 प्रणालीसाठी सुयोग्य आणि माहिती (डेटा) व्यवस्थापनाच्या स्वयंचलित प्रणालीसारखी किंवा मशिन नियंत्रकांना ‘टच स्क्रीन’सारखी वैशिष्ट्ये बहुतेक मशिन उत्पादकांनी आत्मसात केल्याचे आढळून आले. याबरोबरच या प्रदर्शनात भविष्यातील उत्पादन प्रणालीवर परिणाम करणारी काही ठळक वैशिष्ट्ये दिसून आली, ती पुढे दिली आहेत. 
 
इमो 2019 मधील काही ठळक वैशिष्ट्ये 
 
स्टार्ट अप क्षेत्रामधील पहिले AI अप्लिकेशन यंदाच्या इमोमध्ये सादर करण्यात आले. AI आणि मशिन लर्निंगवर भरपूर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच इतर नवीन तंत्रज्ञानावरही भर देण्यात आला होता. उदाहरणार्थ, अ‍डिटिव्ह प्रोसेस, IIOT, ओपन प्लॅटफॉर्म कम्युनिकेशन युनिफाइड आर्किटेक्चर (OPC UA) किंवा युनिव्हर्सल मशिन टूल इंटरफेस (UMATI), डिजिटल ट्विन वगैरे.
 

2_1  H x W: 0 x 
 
1. VDW द्वारा विकसित OPC UA किंवा UMATI
 
70 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि भागीदारांकडील 110 मशिनवर असलेले त्यांचे अ‍ॅप्लिकेशन हे UMATI प्रणालीचे सर्वात मोठे आकर्षित करणारे वैशिष्ट्य होते. मशिन आणि खढ प्रणालींमधील जागतिक पातळीवरील इंटरफेस सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये कार्य करू शकतो, हे या ठिकाणी प्रथमच पाहण्यास मिळाले.
 
UMATI ची ढोबळ संकल्पना
 
VDW ही जर्मन मशिन टूल बिल्डर असोसिएशन आणि त्यांच्या इतर 17 भागीदारांनी 2018 मध्ये UMATI ची निर्मिती केली आहे. UMATI अद्याप पूर्ण विकसित झालेली नाही. मूलतः मशिन टूलसाठी जागतिक स्तरावर लागू होणारी परिभाषा निश्चित करण्यासाठी बनविलेले हे ओपन प्लॅटफॉर्म कम्युनिकेशन युनिफाइड आर्किटेक्चर आहे. डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर सिस्टिम यांच्यात माहिती आयात करणे, त्यातून निर्यात करणे सुलभ, सुरक्षित आणि अखंड असणे गरजेचे आहे. मशिन वापरकर्ते आणि मशिन टूल उद्योगांच्या फायद्यासाठी, सर्व जगासाठी एकच मुक्त मानक (ओपन स्टँडर्ड) निश्चित करून UMATI या समस्येचे निराकरण करते. भविष्यातील उत्पादनासाठी UMATI नवीन शक्यतांचा पुढीलप्रमाणे विचार करते.
• ग्राहकाकडील IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकोसिस्टिममध्ये मशिन टूल कनेक्शन विनासायास करणे.
• ग्राहकानुरूप प्रकल्प जलद कार्यान्वित करून खर्च कमी करणे.
 
2. सिन्युमेरिक वन - डिजिटल ट्विन
 
मशिन टूल उद्योगाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सीमेन्स कंपनीने ‘डिजिटल नेटिव्ह सी.एन. सी.’ ही या प्रकारची पहिली नियंत्रण प्रणाली सादर केली. एका अभियांत्रिकी प्रणालीपासून मशिन नियंत्रक (कंट्रोलर) आणि संबंधित डिजिटल ट्विन तयार करण्यासाठी या प्रणालीतील सॉफ्टवेअर काम करते आणि अशा प्रकारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या अखंड एकीकरणास (इंटिग्रेशन) हातभार लावते. आभासी आणि वास्तविक कार्यवस्तू तसेच उच्च कामगिरी देणारे हार्डवेअर यांच्यातील परस्परक्रियेद्वारे हे शक्य होते. उत्पाद, उत्पादन आणि कामगिरीच्या प्रारंभापासून शेवटापर्यंत डिजिटल ट्विन केल्यामुळे मशिन टूल उत्पादक आणि वापरकर्ते दोघांचाही फायदा होतो. 
 
सिन्युमेरिक वन उत्पादकाला त्यांच्या विकास प्रक्रियेची संपूर्ण आभासी (व्हर्च्युअल) प्रतिकृती उपलब्ध करते. यामुळे उत्पादन विकसित करून ते बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी होतो. अगदी कमिशनिंग टप्प्याची तयारीदेखील आभासी स्वरूपात केली असल्याने, कमिशनिंगसाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ कमी होतो. त्याव्यतिरिक्त हार्डवेअर प्रत्यक्षात उपलब्ध होण्यापूर्वीच त्याविषयी परिणामकारक चर्चा करणे शक्य होते. जणू काही प्रत्यक्षात घडते आहे, असे सिम्युलेशन केल्यामुळे वापरकर्त्यांना एका संगणकावर मशिनचा संपूर्ण सेटअप आणि ऑपरेशन पाहता येते.
 
प्रत्यक्षातील मशिन आणि त्याचे आभासी स्वरूप यांच्यातील डेटाची देवाणघेवाण सतत होत असल्याने डिजिटल ट्विनमुळे उत्पादक आणि अंतिम वापरकर्ते दोघांचाही बराच लाभ होतो. परंतु यासाठी मशिन आणि त्याच्या डिजिटल ट्विनदरम्यान त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात डेटाची देवाणघेवाण कायम ठेवणे आवश्यक आहे. याला क्लोज लूप मॅन्युफॅक्चरिंग 4.0 असे म्हणतात. डिजिटल ट्विनमधील एक निर्णायक घटक म्हणजे मशिनच्या स्ट्रक्चरल डायनॅमिक्सचा अभ्यास करण्याची सुविधा.
 
3. अ‍डिटिव्ह उत्पादन - त्रिमितीय (3D) प्रिंटिंग अ‍प्लिकेशन
 
इमो 2017 मध्ये त्रिमितीय प्रिंटिंगने प्रथमच भरीव स्वरूपात पदार्पण केले. ते वेगवेगळ्या कामांसाठी आता चांगले प्रस्थापित झाल्याचे इमो 2019 मध्ये दिसून आले. प्रामुख्याने कमी वजनाची नमुना उत्पादने (प्रोटोटाइप) असे सिम्युलेशनद्वारे मदत मिळणारे उत्पाद करण्यामध्ये मायक्रो लेझर सिंटरिंग तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 
(3D) सॉफ्टवेअर निर्माता आणि डिझाइनर यांनी ज्यातून नवीन भौमितिक आकार निर्माण होऊ शकतील असा निर्मितीप्रधान (जनरेटिव्ह) डिझाइन दृष्टिकोन स्वीकारण्याची आवश्यकता आहे. एका उदाहरणाद्वारे हे स्पष्ट होईल. जनरल मोटर्सने नवीन हलक्या वजनाच्या सीट रिटेनरचे डिझाईन तयार करताना ही अ‍ॅडिटिव्ह उत्पादन प्रक्रिया वापरली आहे, असे म्हणतात. पूर्वी जिथे आठ लहान लहान भाग जोडून सीट रीटेनर बनविला जायचा, त्याऐवजी आता एकच (सर्वसमावेशक) भाग बनविला जातो आणि तो वजनाला 40% हलका असला तरीही 20% अधिक मजबूत आहे.
 
अ‍डिटिव उत्पादन प्रक्रियेमध्ये विरूपण (डिस्टॉर्शन) आणि आकुंचन होण्याची शक्यता असते आणि ते थांबविले तरच यंत्रभाग निर्दिष्ट केलेल्या मोजमापांच्या टॉलरन्समध्ये बनविला जाईल. ऑप्टिकल मापन तंत्रज्ञान वापरल्याने परिमाणातील विचलन पटकन लक्षात येते आणि नंतर ते सुधारात्मक यंत्रणाद्वारे दुरुस्त केले जाऊ शकते.
 
16 ते 21 सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत चालू असलेल्या इमो 2019 ची समाप्ती होईपर्यंत, या धातुकाम उद्योगाच्या जगातील अग्रगण्य व्यापार मेळ्यामध्ये 150 देशांमधील सुमारे 1,17,000 उत्पादन तज्ज्ञ उपस्थित राहिले होते. एकंदर उपस्थितांपैकी 50% पेक्षा जास्त परदेशातून आलेले होते. इमो 2017 व्यापार मेळाव्याच्या तुलनेत या वर्षी जरा कमी प्रतिसाद असला तरी परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत मात्र 20% वाढ झाली आहे. यापैकी एक तृतीयांश पाहुणे चीन, जपान, तैवान आणि भारत या आशियाई देशांमधून आले होते. या व्यापार मेळाव्यात पोलंड, स्वीडन, रशिया आणि तुर्कस्तान या इतर देशांचेही भरघोस प्रतिनिधित्व होते. आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये जगभरातील एकूण 2,221 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जर्मनीतील 838, जपान 82, तैवान 221, चीन 233, तर भारतातील 36 कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एवढ्या मोठया प्रदर्शनात भारतातील केवळ 36 कंपन्यांनी सहभाग नोंदविणे हा भारतीय उत्पादकांना नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारा आकडा आहे.
 

ravi naik_1  H  
रवि नाईक
सल्लागार  
9359104060
 
रवि नाईक यांना टूलिंग क्षेत्रातील 40 हून अधिक वर्षांचा अनुभव असून ते टूलिंग आणि मशिनिंग अ‍प्लिकेशनविषयक सल्लागार आहेत.