फेस मिलिंग

Udyam Prakashan Marathi    28-Mar-2020   
Total Views |
 
आज दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्तरावरील कारखानदार एकाच प्रकारच्या यंत्रभागाच्या यंत्रणावर अलंबून नसतात. त्यांच्या कारखान्यात सदैव काही ना काही काम सुरू राहणे आवश्यक असते, म्हणजेच त्यांची मशिन अखंड कार्यरत असावी लागतात. उपलब्ध मशिनवर विविध प्रकारचे यंत्रभाग बनविता येत असल्याने आणि त्यांना विभिन्न प्रकारच्या उद्योगक्षेत्रांबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे ते शक्य होते. जॉब वर्क पद्धतीने यंत्रण करून देणाऱ्या कारखानदारांना वाहन उद्योग, व्हॉल्व्ह निर्मिती/तेल क्षेत्रातील उद्योग, एअरोस्पेस, टर्बाइन, विद्युतशक्ती सेक्टर, सामान्य अभियांत्रिकी यंत्रभाग, मशिन टूल इत्यादी उद्योगक्षेत्रातील यंत्रभाग बनविण्याची कामे मिळत असतात. एखाद्या उद्योगक्षेत्रात मंदी असेल, तर त्यांची मशिन वर उल्लेख केलेल्या अन्य कार्यक्षेत्रातील यंत्रभाग बनविण्यात कार्यरत राहतात. यामुळे या कारखानदारांच्या उत्पादनक्षमतेचा चांगला आणि पुरेपूर उपयोग होतो आणि त्यांचा व्यवसाय एका उद्योगक्षेत्रातून कमी मागणी असली तरी थांबत नाही.
 
आमचे एक ग्राहक कारखानदार, वाहन उद्योगाचे, व्हॉल्व्हचे, एअरोस्पेस, तेल आणि गॅस उद्योगक्षेत्रातील यंत्रभाग आणि शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या पंपाचे काही भाग निर्माण करण्याचे काम करतात. आम्ही बऱ्याच काळापासून या ग्राहकाला निरनिराळे उपाय सुचविणे, तांत्रिक सल्ला देणे अशी मदत करीत आहोत. एका ‘फ्रेम’चे (चित्र क्र. 1) यंत्रण करताना त्यांना अधिक आवर्तन काळ, टूलचे कमी आयुष्य आणि पृष्ठीय फिनिशची गुणवत्ता अशा समस्या येत होत्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलाविले.
 

1_1  H x W: 0 x 
 
या ग्राहकाकडे अलॉय स्टील, कास्ट आयर्न आणि यंत्रण करण्यास अवघड असलेल्या विभिन्न मटेरियलपासून बनलेले यंत्रभाग यंत्रण करण्यासाठी येत असत. त्यामुळे ग्राहकाला मटेरियलनुरूप वेगवेगळ्या प्रकारच्या कटर बॉडी आणि प्रत्येक वेळी इन्सर्ट बदलणे, यातूनही सुटका हवी होती. वरील विभिन्न मटेरियलचे यंत्रण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ग्रेडसह एक सामाईक इन्सर्ट हवा होता. आम्ही त्यांना सुचविलेल्या उपायात विभिन्न मटेरियलसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या ग्रेडचे इन्सर्ट समान कॅरिअर बॉडीवर बसणारा कटर (चित्र क्र. 2) होता.
 

3_1  H x W: 0 x 
 
सध्या वापरात असलेल्या सेटअपमध्ये 4 कोपरे असलेल्या एक कडेच्या (सिंगल एज) पॉझिटिव्ह इन्सर्टबरोबर टूल वापरले आहे. यंत्रभागाचे मटेरियल कास्ट स्टील आहे. पृष्ठभागाच्या यंत्रणासाठी वापरलेल्या पासची संख्या अधिक आहे आणि टफ ग्रेडचा इन्सर्ट वापरला आहे. प्रत्येक पासमध्ये कमी सरकवेगासह कापाची खोली कमी असल्याने कर्तन कडांची झीज जास्त आणि टूलचे आयुष्य कमी आहे. सध्याच्या कामाच्या पद्धतीचा तपशील पुढे दिला आहे. 
 
यंत्रभाग मोठ्या आकाराचा असून यंत्रणासाठी त्यावर असलेला स्टॉकसुद्धा जास्त (जवळजवळ 8 मिमी.) आहे.
• यंत्रभाग : फ्रेम
• मटेरियल : कास्ट स्टील
• ऑपरेशन : फेस मिलिंग
• मशिन : व्ही.एम.सी., BT40 टेपर
• स्पिंडल शक्ती : 12 Kw
• मशिनचा सर्वाधिक आर.पी.एम. : 6000
 
सध्याच्या पद्धतीतील समस्या
• टूल आयुष्य कमी
• पृष्ठीय फिनिश अजून सुधारला पाहिजे
• कडांवरील बर
 
आम्ही सध्याच्या यंत्रण प्रक्रियेचा अभ्यास केला. आमच्या इन्सर्टमध्ये वायपिंग कड मोठी असल्याने यंत्रभागाच्या कडांवर बरची निर्मिती कमी होते. त्यामुळे आम्ही तो इन्सर्ट वापरण्याचा प्रस्ताव ठेवला. पासची संख्या अधिक आहे हे आम्ही पाहिले होते. त्यामुळे कापाची खोली आणि सरकवेगात आम्ही वाढ करू शकलो, कारण कापाची खोली अधिक असली, तरी या इन्सर्टमध्ये त्यातून निर्माण होणारे कर्तन बल पेलण्याची क्षमता आहे. त्याच्या विशेष भूमितीमुळे चांगला व्हिज्युअल फिनिश मिळू शकला. आमच्या उत्पादाची वैशिष्ट्ये पुढे तपशीलवार सांगितली आहेत आणि सुधारित कार्यपद्धतीची माहिती तक्ता क्र. 1 मध्ये दिली आहे. 
 

2_1  H x W: 0 x 
 
नवीन पद्धत 
आम्ही कापाची खोली 0.8 पासून 2.0 मिमी.पर्यंत वाढविली आणि पासची संख्या 10 वरून 4 वर आणली. सरकवेग प्रति दंत 0.08 पासून 0.12 मिमी. इतका वाढविला. इन्सर्टच्या वायपिंग कडेची लांबी जास्त असल्याने अधिक कापाची खोली आणि सरकवेग असूनसुद्धा बरची निर्मिती कमी असते हा फायदा आहे.
 
वैशिष्ट्ये
• पॉझिटिव्ह सर्पिल कर्तन कडेसह चौरस इन्सर्ट
• कमी स्पिंडल शक्ती असलेल्या मशिनसाठी परिणामकारक 4 कर्तन कडांचे 90 अंशात फेस मिलिंग
• विशिष्ट भूमिती आणि रुंद वायपिंग कड
• चांगली दृढता मिळण्यासाठी मोठे स्क्रू होल आणि इन्सर्टचे कोनीय क्लॅम्पिंग
• उच्च सरकवेगाने यंत्रण करण्याची क्षमता.
• रुंद वायपिंग कड असल्यामुळे उच्च सरकवेग असतानाही उत्तम पृष्ठीय फिनिश मिळू शकतो.
• कर्तन कडेच्या विशिष्ट भूमितीमुळे चिप वाहून नेण्याचे कार्य चांगले आणि कर्तन बल कमी लागते.
• सुट्या भागांची आवश्यकता कमी, त्यामुळे इन्व्हेंटरी कमी
• स्टील, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनिअम, कास्ट आयर्न, एसजी आयर्न अशा विविध कामांसाठी वापरता येते.
 
फायदे
1. टूलच्या आयुष्यात 86% पेक्षा अधिक वाढ झाली.
2. प्रति यंत्रभाग खर्च 45% ने कमी झाला.
3. उत्पादनक्षमता 100% ने वाढली.
4. यंत्रभागाच्या कडांवरील बर कमी झाली.
5. चांगला पृष्ठीय फिनिश मिळाला.
 
 
 

vijednra_1  H x 
विजेंद्र पुरोहित
व्यवस्थापक (तांत्रिक साहाय्य), ड्युराकार्ब इंडिया
0 9579352519
 
विजेंद्र पुरोहित यांना मशिन टूल, कटिंग टूल डिझाइनमधील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असून, सध्या ते ‘ड्युराकार्ब इंडिया’ कंपनीमध्ये तांत्रिक साहाय्य विभागाचे प्रमुख आहेत.