मायक्रो ड्रिलिंग एस.पी.एम.

Udyam Prakashan Marathi    04-Apr-2020
Total Views |
 
1998 साली बंगळुरु येथे सुरू झालेली 'सुहनर' ही कंपनी यंत्रण करणारे कारखाने, पॉवर टूल आणि ट्रान्स्मिशन यंत्रभाग या क्षेत्रातील समस्यांवर उपाय पुरविण्याचे (सोल्युशन प्रोव्हायडर) काम करते. आमचा यंत्रण विभाग वस्तूनिर्मितीच्या क्षेत्रात किफायतशीर उपाययोजना देत असल्याने आज ड्रिलिंग, मिलिंग आणि टॅपिंग प्रक्रियांमधील समस्यांवर उपाय देणारी प्रमुख कंपनी म्हणून आमची ओळख आहे. विविध प्रकारच्या यंत्रभागांसाठी बनणाऱ्या स्पेशल पर्पज मशिनसाठी (एस.पी.एम.) उपयुक्त आणि पूरक प्रणालीदेखील आम्ही देतो. 
 
ड्रिलिंग, मिलिंग, टॅपिंग प्रक्रियेसाठी आमची कंपनी विस्तृत श्रेणीतील स्पिंडलचा पुरवठा करते. ऑटोमोटिव्ह, ऑइल आणि गॅस, इलेक्ट्रिकल, स्विच गिअर, विमान उद्योग इत्यादी क्षेत्रांत दीर्घकाळ न बिघडणारा रनआउट, विश्वासार्हता आणि स्विस गुणवत्ता असलेले हे क्रोम प्लेटेड स्पिंडल वापरले जातात.
 

1_1  H x W: 0 x 
 
उदाहरण
 
एका यंत्रभागाच्या उत्पादन प्रक्रियेसाठी एस.पी.एम. तयार करताना सुहनर स्पिंडलचा वापर कसा केला, याविषयी पुढील उदाहरणामध्ये माहिती दिली आहे. पुण्यातील सासवड येथील 'ऑक्टॅगॉन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी' कंपनी गेल्या 12 वर्षांपासून उत्तम दर्जा, कमी किंमतीचे स्वयंचलन (ऑटोमेशन), एस.पी.एम., टेबल टॉप सी.एन.सी. आणि मिलिंग मशिनची निर्मिती करीत आहे. वाहन उद्योगातील ओ.इ.एम.साठी (खासकरून बजाज ऑटो लि. आणि त्यांचे पुरवठादार) सुहनरचा स्पिंडल वापरून ड्रिलिंग, टॅपिंग, मिलिंगसाठी दर्जेदार एस.पी.एम.ची निर्मिती करणारी कंपनी म्हणूनही 'ऑक्टॅगॉन' ओळखली जाते. 
 
आम्ही दोघांनी एकत्र येऊन ग्राहकांसाठी मायक्रो ड्रिलिंग एस.पी.एम. (चित्र क्र. 1) बनविले आहे. बाटल्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोल्डमध्ये सूक्ष्म छिद्रे पाडण्यासाठी बनविलेल्या या एस.पी.एम. उपाययोजनेद्वारा पूर्वीच्या प्रकियेतील अडचणींवर मात करून उत्पादकतेत सुधारणा केली गेली.
 
कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये 
· संकल्पना डिझाइनपासून ग्राहकाकडे मशिन सुरू करेपर्यंतची सर्व कामे योग्य त्या क्रमाने केली जातात.
· 3D/2D यंत्रचित्र (ऑटो कॅड/सॉलिड वर्क वापरून) 
· मशिनची वेळेवर डिलिव्हरी
· मशिन आणि वापरलेल्या भागांसाठी विक्रीपश्चात सेवांचा आधार (अाफ्टर सेल्स सपोर्ट)
 
एस.पी.एम. वापरण्यापूर्वी
 
· चित्र क्र. 2 मधील यंत्रभागात दाखविल्याप्रमाणे, आमचे ग्राहक प्रत्येक मोल्डच्या परीघावर 2, 3 आणि 4 मिमी. व्यासाची आणि आतल्या बाजूला 0.8, 1.0 मिमी. व्यासाची अशी एकूण पन्नास छिद्रे पाडण्यासाठी ±2’ इंडेक्सिंग अचूकता असलेल्या मॅन्युअल इंडेक्सिंग टेबलसह हाताने चालविले जाणारे पारंपारिक ड्रिलिंग मशिन वापरीत होते. हे करताना दोन्ही बाजूच्या छिद्रांसाठी प्रथम त्यांचे स्थान निश्चित (मार्किंग) करावे लागते. त्यामुळे त्या कामाला कमीतकमी 30 मिनिटे किंवा ऑपरेटरच्या कौशल्यानुसार त्यापेक्षाही जास्त वेळ खर्च होतो. एका कार्यवस्तूमधील छिद्रांचे स्थान निश्चित करणे आणि HSS ड्रिल वापरून हळूहळू ड्रिलिंग करण्यासाठी सुमारे 60 मिनिटे इतका आवर्तन काळ लागत होता.
 

2_1  H x W: 0 x 
 
अडचणी
· वरील वर्णनानुसार असे दिसून येते की, मोल्डमध्ये छिद्रे बनविणे ही एक कंटाळवाणी, वेळखाऊ आणि ग्राहकांच्या उत्पादनात खीळ घालणारी प्रक्रिया होती.
· कॉलम ड्रिलिंग मशिनमध्ये स्पिंडलचा वेग वाढविण्याची मुभा नव्हती.
· मायक्रो ड्रिलिंग असल्यामुळे आणि सरकवेग ऑपरेटरवर अवलंबित असल्यामुळे टूल तुटण्याच्या समस्येबरोबर ही प्रक्रिया वेळखाऊसुद्धा होती. या प्रक्रियेसाठी स्टँडर्ड 5 अक्षीय सी.एन.सी. मशिन वापरणे ग्राहकासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते. 
 

3_1  H x W: 0 x 

4_1  H x W: 0 x 
 
उपाय
त्यासाठी आम्ही एक आटोपशीर, किफायतशीर 5 अक्षीय सी.एन.सी. एस.पी.एम. बनविण्याचा निर्णय घेतला. मायक्रो ड्रिलिंगमध्ये वापरले जाणारे नवीनतम हत्यारधारक (टूल होल्डर) त्यात व्यवस्थित बसण्यासाठी यातील स्पिंडलचा रनआउट खूपच कमी असणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही BEX 15/HSK 50 स्पिंडल (चित्र क्र. 5) वापरण्याचे ठरविले.
 
स्पिंडल BEX 15 ची माहिती
अधिकतम ड्रिलिंग क्षमता : स्टील 600 N/मिमी.2 मध्ये 15 मिमी. व्यास
स्पिंडल प्रकार : HSK 50
जास्तीतजास्त स्पिंडल गती : 23000 आर.पी.एम.
रनआउट : 0.005 मिमी.पेक्षा कमी
मोटर संरक्षण : IP 55
 

5_1  H x W: 0 x 
 
एस.पी.एम.ची वैशिष्ट्ये
· X, Y, Z अक्ष अनुक्रमे 300 मिमी., 300 मिमी., 200 मिमी., रेषीय हालचाल.
· हायड्रोग्रिपर हत्यारधारकाला सामावून घेणारे नवीन स्पिंडल नोज HSK 50
· चेंजओव्हर पुली आणि व्ही.एफ.डी. असलेले, 625 ते 23000 आर.पी.एम.पर्यंत चालू शकणारे स्पिंडल.
· इंडेक्सिंग टेबल : यूकॅम मेकचे सर्व्हो इंडेक्सिंग टेबल 
· कंट्रोलर : 5 अक्षीय सी.एन.सी. सीमेन्स 808 D अ‍ॅडव्हान्स
· सर्व परिमाणातील टॉलरन्स आणि कोन (अँगल) मिळविण्यासाठी 5 सर्व्हो अक्षीय हालचाल 
· तीन रेषीय अक्ष X, Y आणि Z तसेच दोन फिरणारे अक्ष A आणि B
· छिद्रांच्या स्वयंचलित स्थाननिश्चितीसाठी CAM इंटरफेसिंग
· कार्यवस्तुचा 50 मिमी.पासून 200 मिमी.पर्यंतचा व्यास सामावून घेऊ शकेल असा 3 जॉ चक 
· सर्व्हो Z अक्षाद्वारे पेक फीडिंगची तरतूद
मायक्रो ड्रिलिंग एस.पी.एम. मशिनचे कार्य कसे चालते हे पाहण्यासाठी सोबत दिलेला QR कोड 
स्कॅन करा. 

qr_1  H x W: 0  
 
एस.पी.एम. वापरल्यानंतर झालेले फायदे
 
· 5 अक्षांवर ड्रिलिंग आणि CAM इंटरफेस यांच्यामुळे मार्किंग आणि इंडेक्सिंग यांसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होऊ शकली.
· उच्च गतीचे (11000 आर.पी.एम.पेक्षा अधिक) स्पिंडल असल्याने एच.एस.एस. ड्रिलऐवजी कार्बाइड ड्रिल वापरता आले. 
· स्वयंचलित स्थाननिश्चिती, इंडेक्सिंगचे आवर्तन, उच्च यंत्रणवेग आणि सरकवेगामुळे आवर्तन काळ कमी होऊन 50 छिद्रे पाडण्यासाठी तो 20 मिनिटे इतका झाला.
 
अंतिम लक्ष्य साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न
4 पॉइंट क्लॅम्पिंग प्रणाली असणाऱ्या हायड्रोग्रिपर HSK 50 द्वारा आम्ही 11000 आर.पी.एम.च्या गतीमध्ये कार्बाइड ड्रिलवर स्वयंचलितपणे स्विच करतो. परंतु, कोनात पाडायच्या 0.8 मिमी., 1 मिमी. व्यासाच्या भोकांच्या बाबतीत थोड्या प्रमाणात ड्रिल तुटण्याची समस्या होती. म्हणून टूल पुरवठादारासह ड्रिल डिझाइनवर काम केले. कठीण टूल वापरून या यंत्रणवेगावर आणि सरकवेगावर ड्रिल तुटणार नाही, असे टूल वापरण्याचे ठरविले. 
 

chart_1  H x W: 
 
फायदे
· आटोपशीर मशिन
· या मशिनची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या प्रमाणित 5 अक्ष सी.एन.सी. मशिनच्या 1/3 आहे.
· स्पिंडल आर.पी.एम.ची सर्वात विस्तृत श्रेणी (रेंज)
· उच्च अचूकता आणि पुनरावृत्तीक्षमता
· देखभालीची आवश्यकता नसणारे स्पिंडल
 

sagar_1  H x W: 
सागर दवंडे 
9766322063 
 
यांत्रिकी अभियंते असलेले सागर दवंडे सुहनर इंडिया प्रा. लि. कंपनीच्या विक्री विभागात उप व्यवस्थापक आहेत.