स्मार्ट टूल डिस्पेन्सर

Udyam Prakashan Marathi    07-May-2020
Total Views |

1 qr_2  H x W:
 
आमच्या कारखान्यात इन्सर्टचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या इन्सर्टचे व्यवस्थापन करणे, इन्सर्टच्या वापरावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यकही होते. आमचे स्टोअर फक्त एकाच शिफ्टसाठी चालत असल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टसाठी इन्सर्टचे वितरण अंदाजे होत असे. त्यामुळे त्याचा गैरवापरही होत होता. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या नोंदी ठेवणे गरजेचे होते. उदाहरणार्थ, ऑपरेटरला कधी, किती, कोणत्या ब्रँडचे, तसेच कोणत्या मशीनसाठी इन्सर्ट दिले. त्यासाठी इतर संसाधने जसे की, मनुष्यबळ, कागद, वेळ असे सर्व खर्ची पडत होते. आम्हाला इन्व्हेंटरीवर नियंत्रण ठेवणे तसेच इन्सर्टच्या आयुर्मानाचे विश्लेषण करणे या गोष्टींसाठी वेगळी मानवी यंत्रणा (मॅन्युअल सिस्टिम) राबवावी लागत होती. या सर्वांवर आम्ही उपाय शोधत असताना बाजारपेठेतील अनेक पर्यायांपैकी एक असलेला 'स्मार्ट टूल डिस्पेन्सर' या पर्यायावर शिक्कामोर्तब केले. 
 
स्मार्ट टूल डिस्पेन्सर म्हणजे आपण थोडक्यात असे म्हणू शकतो की, ATM मशिनसारखी संकल्पना असणारी इन्सर्ट डिस्पेन्सिंग मशीन होय. यामध्ये आपल्याला 24 तास स्टोअरकीपर, सुपरवायजरच्या मदतीशिवाय कोणताही इन्सर्ट आपली ओळख पटवून स्वयंचलितपणे मिळू शकतो, तसेच वापरलेले इन्सर्ट आपण परत करू शकतो. याच्यामध्ये 3 प्रकारची कामे होतात. 
 
1. इश्यु इन्सर्ट : याचा अर्थ तुम्हाला इन्सर्ट पाहिजे आहे. 
2. रिटर्न इन्सर्ट : म्हणजे वापरलेला इन्सर्ट परत करावयाचा आहे. 
3. इश्यु अँड रिटर्न इन्सर्ट : वापरलेला इन्सर्ट परत करावयाचा आहे आणि नवीन इन्सर्टही पाहिजे आहे. 
 
समजा यंत्रणादरम्यान किंवा हलगर्जीपणामुळे एखादा इन्सर्ट हरविला असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपण पहिला पर्याय वापरणार. त्यामधून निघालेल्या अहवालामध्ये आपल्याला कळते की, इन्सर्ट परत केलेला नाही आणि त्यांना नवीन इन्सर्ट पाहिजे आहे. तसेच समजा एखाद्या कामगाराने नजरचुकीने इन्सर्टऐवजी स्टीलचा बार किंवा दुसरी काही वस्तू परत केली असेल तर मशीनमध्ये असलेल्या बार कोड सिस्टिमद्वारे आपल्याला ते समजू शकते. त्यामुळे अनावधानाने किंवा जाणूनबूजून चुकीच्या गोष्टी झाल्या तरी ते अहवालात समजते. त्यामुळे मशीन फूलप्रुफ झाली आहे. हे मशीन कसे काम करते ते पाहण्यासाठी शेजारी दिलेला QR कोड आपल्या मोबाईलवर स्कॅन करा. 

1 qr_1  H x W:  
 
बाजारात अशा प्रकारचे अनेक उत्पाद असतानाही स्मार्ट टूल डिस्पेन्सरची आम्ही निवड केली, कारण त्याची इतराहून वेगळी अशी काही वैशिष्ट्ये आहेत. 
1. साधारण कौशल्य (सेमी स्किल्ड) असलेला ऑपरेटर, ज्याला आकड्यांची ओळख आहे, तोदेखील या मशीनचा वापर अतिशय सुलभतेने करू शकतो. 
2. मशीनमधील स्टॉक प्रत्यक्ष पाहता येतो. 
3. अत्यंत कमी जागेत मावणारे (पॉकेट फ्रेंडली) 
4. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे सोपे एकत्रीकरण (स्मूथ इंटिग्रेशन)
5. आपल्याला पाहिजे तसे अहवाल मिळतात. (कस्टमाइज्ड रिपोर्ट)
6. अतिशय कमी वेळेत म्हणजे केवळ सहा महिन्यांमध्ये गुंतवणुकीवर परतावा मिळतो. 
7. पोर्टेबल असल्यामुळे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेण्यासाठी अतिशय सुलभ 
8. कनेक्टिव्हिटीसाठी सोपा उपाय, वायरलेस
9. पाहिजे त्या आकारात (कस्टमाइज्ड साइज) उपलब्ध या सर्वांचा आम्हाला असा फायदा झाला की, स्टोअरच्या मदतीशिवाय ऑपरेटरला 24/7 कधीही इन्सर्ट मिळू लागले. त्यामुळे इन्सर्ट उपलब्ध नाहीत या कारणाने उत्पादन थांबणे बंद झाले. 
 
• काही ठिकाणी होणारा गैरवापर थांबल्याचे लक्षात आले. 
• सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व इन्सर्टचा स्टॉक एकाच ठिकाणी म्हणजे मशीनमध्येच होत असल्यामुळे काही सेकंदातच आम्हाला इन्व्हेंटरी समजू लागली. 
• इन्सर्टनुसार, मशीननुसार, वापरकर्त्यानुसार, यंत्रभागानुसार अशा पाहिजे त्या स्वरुपात सर्व अहवाल मिळू लागले. त्यामुळे लेखी अहवाल पूर्णपणे बंद झाले. 
• काही ठिकाणी ऑपरेटरकडून आलेले, त्यांनी वापरलेले इन्सर्ट याचा आधी हिशेब लागत नव्हता. आता स्वयंचलित ऑपरेशनमुळे आणि मशीनमध्ये असलेल्या काही पर्यायांमुळे तो पूर्णपणे मिळू लागला आहे. 
• मशीनमधून मिळणारे काही अहवाल इन्सर्टचे आयुष्य शोधण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे त्यांचा वापर करून आम्ही विश्लेषण करू शकत आहोत. काही इन्सर्ट, तसेच त्यांचे ब्रँड बदलून प्रति यंत्रभाग खर्चदेखील कमी झाला. 
• सॉफ्टवेअरमधील 'रीऑर्डर लेव्हल' या पर्यायामुळे कोणत्याही इन्सर्टचा स्टॉक मर्यादेपेक्षा कमी झाल्यानंतर आपोआप सूचना मिळू लागली. त्यामुळे कधीही इन्सर्टची कमतरता भासली नाही. इन्व्हेंटरीवरसुद्धा नियंत्रण ठेवता आले. जास्तीच्या इन्व्हेंटरीवर होणारा खर्चसुद्धा आपोआप नियंत्रणात आला. 
 
स्मार्ट टूल डिस्पेन्सरची क्षमता 
स्मार्ट टूल डिस्पेन्सर हे वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये SD3015, SD4015, SD5015, SD6015, SD8015, SD10015 अशी मॉडेल आहेत आणि त्यांची अनुक्रमे क्षमता ही 450, 600, 750, 900, 1200, 1500 इन्सर्टची आहे. आम्ही वापरत असलेल्या SD3015 या मॉडेलची किंमत 95,500 रुपये आहे. 
 
स्मार्ट टूल डिस्पेन्सर कसे काम करते? 
स्मार्ट टूल डिस्पेन्सरचा वापर करताना ऑपरेटर सुरुवातीला रेडीओ फिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) कार्डद्वारे स्वतःची ओळख पटवून देतो. त्यानंतर त्याला हवा असणारा इन्सर्ट आणि त्याची संख्या त्यामध्ये नमूद करतो. तसेच वापरलेला इन्सर्ट परत करतो. शेवटी त्याला हवा असणारा इन्सर्ट मिळतो. 
 
उदाहरण 1 
 
विश्लेषण करण्यासाठी आम्ही इन्सर्टची पर्चेस क्वांटिटी आणि ती क्वांटिटी वापरून तयार होणारे यंत्रभाग याचा अभ्यास करून आम्ही काही ब्रँडमध्ये बदल केले. या मशीनचा सर्वात महत्त्वाचा उपयोग इन्सर्टच्या व्यवस्थापनासाठी होत आहे. हे इन्सर्ट खूप महाग असतात. ते चोरीला जाण्याचे प्रमाणदेखील खूप असते. ते गहाळ झाले तरी त्याचे आर्थिक नुकसान कारखानदाराला सहन करावे लागते. ते टाळण्यासाठी हे मशीन फार उपयुक्त ठरते. 
आमच्याकडे महिन्याला वेगवेगळ्या प्रकारचे आणि ब्रँडचे जवळपास 500 इन्सर्ट लागत होते. त्यांची किंमत जवळपास 1 लाख 75 हजार रुपयांच्या दरम्यान होती. जेव्हा आम्ही स्मार्ट टूल डिस्पेन्सरचा वापर सुरू केला तेव्हा त्यातून मिळणाऱ्या विश्लेषण अहवालाचा वापर करून आम्ही काही ब्रँडमध्ये बदल केला. त्याचा फायदा असा झाला की आम्हाला लागणाऱ्या इन्सर्टची संख्या कमी झाली आणि त्याचा लागणारा खर्चही कमी झाला. 
 

t1_1  H x W: 0  
 
उदाहरण 2 
 

t2_1  H x W: 0  
 
स्मार्ट टूल डिस्पेन्सरमध्ये आम्ही जे मॉडेल (SD3015) वापरतो त्यामध्ये 30 प्रकारचे प्रत्येकी 15 म्हणजेच एकूण 450 इन्सर्ट मावू शकतात. पूर्वी आम्ही पुरवठादाराकडे 10 बॉक्सची मागणी करीत होतो आणि पुरवठादारही 10 बॉक्स आम्हाला एकत्रित देत होता. स्मार्ट टूल डिस्पेन्सर आल्यापासून आम्ही एक धोरणात्मक असा निर्णय घेतला की, सर्व इन्सर्ट फक्त स्मार्ट टूल डिस्पेन्सरमध्येच असतील आणि स्टोअरमध्ये एकही इन्सर्ट नसेल. म्हणजेच एकतर इन्सर्ट मशीनमध्ये असेल किंवा टूल डिस्पेन्सरमध्ये असेल. यामुळे असा फायदा झाला की, आमचा सर्व स्टॉक एकाच ठिकाणी जमा झाला. आता जरी आमची ऑर्डर 10 बॉक्सची असली तरी जेव्हा इन्सर्ट रीऑर्डर लेव्हल 5 होईल तेव्हा सॉफ्टवेअरमधून संकेत मिळाल्यावर आम्ही पुरवठादाराकडून 1 बॉक्स मागवितो आणि त्यातील सर्व 10 इन्सर्ट स्मार्ट टूल डिस्पेन्सरमध्ये भरतो. 
 

t3_1  H x W: 0  
  
पूर्वी यंत्रभागाचे विश्लेषण करून, एखाद्या इन्सर्टची कार्यक्षमता योग्य न वाटल्यामुळे आम्हाला उर्वरीत इन्सर्ट तसेच ठेवावे लागत होते. पण आता आमच्याकडे कुठल्याही क्षणी एका प्रकारचे जास्तीतजास्त 15 च इन्सर्ट असल्यामुळे त्यातील आमचा धोका कमी झाला आहे आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष फायदाच आम्हाला होत आहे. 

rahul phdke_1   
राहूल फडके
भागीदार, 
प्राइम इंडस्ट्रीज 
0 9341102624
 
राहुल फडके हे यांत्रिकी अभियंते असून त्यांनी फायनान्समध्ये एम.बी.ए. केले आहे. त्यांना उत्पादनक्षेत्रातील कामाचा 19 वर्षांचा अनुभव आहे.